Friday, December 15, 2023

योगासनांचा सराव सुरू करताना


आजच्या काळात योगासनांचे महत्व सगळ्यांना पटलेले आहे. योगासने प्रत्येकाने नियमीत करावीत असे माझेदेखील मत आहे. म्हणूनच या ब्लॉगमधे योगासनांच्या सरावाविषयी थोड्या टिप्स देण्याबरोबर काही गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. 

पहिल्यांदा योगासनांचा सराव सुरू करताना पाळावयाच्या टिप्स बघू:

१] योगासने पहिल्यांदाच करणार असल्यास ऑफलाइन फॉरमॅट म्हणजेच प्रत्यक्ष शिक्षकासमोरच करावीत. योगाभ्यासातील बारकावे समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे आणि ते प्रत्यक्ष योगवर्गात हजेरी लावूनच शक्य आहे. 

२] योगासनांचा सराव प्रत्येकानी करावाच हे खरे असले तरी आपल्या वैयक्तिक मर्यादा लक्षात ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकाची लवचिकता, व्यायामाची क्षमता वेगळी असते त्यामुळे प्रत्येक योगासन नीट जमेलच असे नाही. त्यामुळे सहन होईल तेवढेच करावे. 

३] सुरुवातीला कदाचित फक्त १० ते १५ सेकंदे योगासन स्थिर ठेवता येईल आणि फक्त १० ते १५ मिनिटेच क्लास करता येईल. नियमित सरावानी सहनशक्ति  वाढेल आणि जास्त अभ्यास जमू लागेल. 

४] योगासनांचा अभ्यास करताना आसनस्थिति इतकेच श्वास आणि शरीरावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. प्राचीन काळापासून सर्व योगगुरूंनी पुनः पुनः हे अधोरेखित केले आहे. 

५] योगासने करताना शरीराच्या सांध्यांची संपूर्ण हालचाल होते. त्यामुळे हातपाय मोकळेपणानी हलविता येतील असे कपडे घालावेत. 

६] योगासने करताना पोट तसे रिकामे असावे म्हणजे कुठलीही स्थिति घेताना त्रास होणार नाही. सकाळी लवकर अभ्यास करणार असल्यास अर्धा ते एक तास आधी एखादे छोटे केळे किंवा एक दोन खजूर खाता येतील म्हणजे पोट भरणार नाही परंतु गरजेपुरत्या कॅलरीज मिळतील. 

७] योगाभ्यास सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यामुळे कुठल्या हालचाली टाळावयाच्या आहेत ते कळेल. 


योगाभ्यासाविषयी काही गैरसमजांचे स्पष्टीकरण पाहू. 


१] योगासनांनी कधीही दुखापत होऊ शकत नाही - अतिरेकी, क्षमतेच्या पलीकडे केलेल्या कुठल्याही हालचालीचा शरीराला त्रास होतो आणि दुखापत होऊ शकते. याला योगासनेदेखील अपवाद नाहीत. त्यामुळे काळजीपूर्वक हळू हळू अभ्यास वाढवणे गरजेचे आहे. 

२] योगासने करणे म्हणजे अगदी सोपा व्यायाम करणे -  योगासन सराव हा संगीताच्या तालावर, जलद अथवा जोरकसपणे करण्याचा व्यायाम नाही. परंतु योगासन करणेसुद्धा आव्हानात्मक असते आणि यात शरीराबरोबरच मन आणि श्वास स्थिर ठेवण्याचे आव्हान असते. त्याचप्रमाणे शरीराला अनोळखी किंवा नवीन स्थितिदेखील प्रयत्नपूर्वक धरून ठेवावी लागते. 

३] माझे शरीर लवचिक नाही त्यामुळे मला योगासने  करता येणार नाहीत - अनेक योगासने करायला सोपी असतात. सुरुवातीला त्यांचा नियमीत सराव केल्यावर शरीराची लवचिकता वाढते आणि अवघड आसने जमू लागतात. 

४] माझी योगासन स्थिति एखाद्या पुस्तकात किंवा विडियोत दाखवल्याइतकी चांगली दिसत नाही. मग माझ्या सरावाचा काही उपयोग होतोय का? - आपली योगासन स्थिति ही आपल्या क्षमतेनुसार, सरावानुसार आणि वयानुसार असणार आहे. त्यामुळे प्रयत्न करत राहणे सर्वात महत्वाचे असते हे लक्षात ठेवावे. शरीराला त्याचा उपयोग नक्की होतो. 

तेव्हा योगासने योग्य व्यक्तीकडून शिकून घेऊन आपला एक अभ्यासक्रम बसवून घ्यावा आणि योगाभ्यास नियमीतपणे करावा. शरीराचा चिवटपणा वाढवण्यासाठी योगासने अतिशय महत्वाची आहेत. Repetitive stress injuries (म्हणजे एकच हालचाल पुनःपुन्हा केल्याने होणाऱ्या दुखापती उदाहरणार्थ computer वर खूप वेळ काम केल्याने होणाऱ्या दुखापती), त्याचप्रमाणे खेळाडूंची  होणारी शारीरिक झीज टाळण्यासाठी योगासने उपयुक्त आहेत. वयानुसार होणारी शरीराची झीज कमी करण्यासाठी योगाभ्यास जरूरी आहे. मानसिक स्थैर्य, शांतता मिळविण्यासाठीदेखील योगाभ्यास अत्यंत उपयोगी आहे. 


तुम्हा सर्वांना व्यायाम करत राहण्यासाठी शुभेच्छा. माझा कानमंत्र लक्षात असू दया: 

थोडा असला तरी नियमित व्यायाम अतिशय आवश्यक आहे!





Saturday, August 12, 2023

डाएट करू की व्यायाम?


वजन कमी करतानाआपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की  डाएट जास्त महत्वाचे का व्यायाम?  वेट लॉस करताना आपल्याला असा उपाय हवा असतो ज्यामुळे वजन हमखास कमी होईल आणि भविष्यात कमीच राहील. रोजच्या धावपळीत वजन कमी करताना कशाला किती महत्व द्यायचं हे ठरवणं गरजेचं असतं. म्हणून या लेखात याच प्रश्नाचं उत्तर शोधुयात: आहार जास्त महत्वाचा आहे का व्यायाम?



अर्थात या प्रश्नाचं उत्तर इतकं साधं सरळ नाही! प्रथम आपले शरीर कॅलरीज कशा खर्च करते ते पाहुयात. समजा आपण दिवसभरात १०० कॅलरीज खर्च करतो. आपल्याला आश्चर्य वाटेल की यातील सत्तर टक्क्यांहून जास्त कॅलरीज या केवळ शरीर जिवंत ठेवून शरीरातील सर्व प्रक्रिया चालवण्यासाठी वापरल्या जातात. या व्यतिरिक्त १० ते १५% कॅलरीज अन्न खाणे आणि पचवणे यासाठी वापरल्या जातात. उरलेल्या १५ ते २०% कॅलरीज इतर हालचालींसाठी खर्च केल्या जातात. या इतर हालचालींमध्ये रोजची अन्हिके म्हणजे आंघोळ वगैरे, घरातील वावर आणि व्यायाम या सर्वांचा समावेश होतो. आता या कॅलरीज कुठल्याही कामासाठी खर्च केल्या तरी त्या येतात आपल्या आहारातूनच. आहारातून मिळणाऱ्या कॅलरीज त्या दिवशी लगेच वापरल्या जातात किंवा चरबीच्या स्वरूपात साठवल्या जाऊन नंतर गरजेनुसार वापरल्या जातात. 

आता आहार आणि व्यायामाचे वजन कमी होण्यातले योगदान समजून घेणे सोपे जाईल. आपण आत्ताच पहिले की आपल्या रोजच्या कॅलरी खर्चातील ७०% हिस्सा हा शरीरातील आवश्यक प्रक्रिया करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळेच आपला रोजचा आहारच समतोल आणि पोषक असण्याची गरज आहे. समतोल आणि पोषक आहार ही हवा आणि पाण्याइतकीच आपली मूलभूत गरज आहे. चांगला व्यायाम वाईट आहाराची कमतरता भरून काढू शकत नाही. समतोल आणि पोषक आहार चांगल्या तब्येतीचा पाया असल्यामुळे तो नियमीत घेणे ही आपली जीवनशैलीच असली पाहिजे. परंतु वजन कमी करताना जेव्हढया कॅलरी आपण खातो त्यापेक्षा जास्त खर्च कराव्या लागतात. त्यामुळे आहारातून पोषण आणि समाधान मिळण्याबरोबरच निकृष्ट आणि निरुपयोगी कॅलरीज कमी होणे आवश्यक आहे. प्रत्येकाचा समतोल आणि पोषक आहार त्याच्या/तिच्या राहणीमान आणि जीवनशैलीनुसार वेगवेगळा असू शकतो. 


आता आपल्याला समजले असेल की रोजचा, अत्यावश्यक ७० ते ८०% कॅलरी खर्च हा काही आपल्या हातात नाही. तो आपले वय, बांधा, प्रकृती, जीन्स, लिंग यानुसार बदलत जातो. परंतु जास्तीची शारीरिक हालचाल मात्र आपल्या हातात आहे. नियमीत रोज केलेला थोडा व्यायामदेखील आठवडयाभरात, महिन्याभरात अनेक कॅलरीज खर्च करतो. आहाराप्रमाणे असा नियमीत व्यायामदेखील  प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. 

थोडक्यात सांगायचे तर वजन कमी करायला आहार आणि व्यायाम दोन्ही महत्वाचे आहे!


दोन्हींत फरक आहे तो frequency चा. त्याचा आपल्याला किती वेळा विचार करायला लागतो याचा. आपल्याला आहाराविषयी दिवसातून ४ ते ५ वेळेला विचार करावा लागतो आणि योग्य निर्णय घ्यावे लागतात. याउलट आठवड्यातून ३ ते ४ वेळेला व्यायामदेखील वजन कमी करायला मदत करू शकतो. आहार आणि व्यायामाचा समतोल साधल्याने आपला 'वेट लॉस' योग्य पद्धतीने होईल. म्हणजे आरोग्याला हानी न  पोचता होईल. चांगल्या आहारामुळे शरीरातील चरबी कमी होईल, स्नायूंच्या वाढीला मदत होईल आणि शरीराच्या सर्व आवश्यक प्रक्रियांना कॅलरीज मिळतील. चांगल्या व्यायामानी शरीरातील स्नायूंचे प्रमाण वाढेल, चरबी कमी होईल, ताकद, दामसांस वाढेल तसेच शरीराचा आकार सुधारेल. 


वेट लॉस च्या दोन्ही पैलूंसाठी सर्वात महत्वाचे काय तर नियमीतपणा!


तुम्हा सर्वांना व्यायाम करत राहण्यासाठी शुभेच्छा. माझा कानमंत्र लक्षात असू दया: 

थोडा असला तरी नियमित व्यायाम अतिशय आवश्यक आहे!





Sunday, June 4, 2023

 

  वेट ट्रेनिंग म्हणजे काय ?


वेट ट्रेनिंग किंवा रेसिस्टन्स ट्रेनिंग म्हणजे आपल्याला जरा कष्ट करावे लागतील इतपत वजन उचलणे. म्हणजेच स्नायूंना जोर लावला लागेल अशा हालचाली करणे किंवा एखाद्या वजनाच्या विरुद्ध जोर लावावा लागणे. एखादा dumbell उचलण्याचा व्यायाम करताना किंवा स्वतःचे वजन वापरुन push ups करताना शरीराला कष्ट पडतात कारण आपल्या हालचालीला आपल्याच किंवा dumbell च्या वजनाचा अडथळा निर्माण होत असतो. त्यामुळे आपल्या स्नायूंना जोर काढून काम करावे लागते. 

जगातील बहुतांश लोकं दररोज वेट ट्रेनिंग करतात. शेतकरी, कष्टकरी लोकं त्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग म्हणून वेट ट्रेनिंग करत असतात. या वर्गातील स्त्रीयादेखील रोज वेट ट्रेनिंग करतात, ते dumbell सारखे  दिसत नाही एवढंच! या विरुद्ध आधुनिक जीवनशैलीत शारीरिक कष्ट खूपच कमी झाले आहेत. आजकाल अनेक लोकांची बैठी जीवनशैली झाली आहे त्यामुळे त्यांना मुद्दामून ठरवून रेसिस्टन्स ट्रेनिंग करण्याची आवश्यकता आहे. यात स्त्री, पुरुष आणि जेष्ठ सर्व आले. 

काही जणांना वेट ट्रेनिंग या शब्दांची भीती बसलेली असते कारण ते त्यांचा संबंध पाहिलवानांशी जोडतात जे खूपच अवजड वजन उचलण्याचा व्यायाम करतात. त्यामुळे अनेकांची अशी समजूत असते की वेट ट्रेनिंग फक्त बॉडी बिल्डर्स, खेळाडू वगैरेंनी करायचे असते. परंतु आपल्या सर्वांचेच स्नायू, हाडे सुस्थितीत ठेवण्याची गरज असते. शिवाय काही स्त्रियांना अशी भीती वाटते की वेट ट्रेनिंग केल्याने त्यांचे शरीर थोराड, बोजड दिसायला लागेल. सर्वांनी हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की जर एक तंदुरुस्त शरीर राखायचं असेल तर स्नायूंची ताकद आणि स्टॅमिना अत्यंत महत्वाचा आहे. तरच दिवसभर सर्व कामे त्रास न होता सहजगत्या करता येतील. 

आपल्या सर्वांचीच ताकद आणि स्टॅमिना वयानुसार कमी होत जातो. त्यात बैठ्या जीवनशैलीमुळे स्नायू आणि हाडे  अजूनच कमकुवत होत जातात. हळूहळू रोजची कामेदेखील त्रासदायक वाटू लागतात आणि शरीरात अनेक कुरबुरी सुरू होतात. 

आता सर्व प्रथम वेट ट्रेनिंग किंवा रेसिस्टन्स ट्रेनिंग म्हणजे काय ते पाहूया. जेव्हा आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलतो, ओढतो किंवा ढकलतो, जे आपल्याला अवघड वाटते त्यालाच वेट ट्रेनिंग किंवा रेसिस्टन्स ट्रेनिंग म्हणतात. जेव्हा आपण हे नियमित पणे करतो तेव्हा आपल्या स्नायूंना आणि हाडांना मजबूत आणि चिवट बनत जाण्याचा संदेश मिळतो. केवळ इतकेच नाही तर सांध्यांच्या आजूबाजूचे इतर अवयव जसे tendons आणि ligaments इत्यादि मजबूत बनत जातात. Tendon आणि ligament दोरीसारखे अवयव असतात ज्यामुळे स्नायू आणि हाडे जागच्याजागी धरले जातात. 

आता वेट ट्रेनिंग करण्याचे विविध पर्याय बघूयात. पारंपरिक साधने जसे dumbell, barbells, मुदगल इत्यादि वापरुन वेट ट्रेनिंग केले जाते. याशिवाय वेट ट्रेनिंग मशीन्स, फिटनेस बॉल, टयूब्स , केटल बेल इत्यादि साहित्यसुद्धा वापरले जाते. इतकेच नाही तर स्वतःचे वजन देखील रेसिस्टन्स म्हणून वापरले जाते उदाहरणार्थ squats, plank इ. योगासने करतानासुद्धा रेसिस्टन्स ट्रेनिंगसारखा परिणाम होतो. हि सर्व साधने काही महिन्यांनी किंवा वर्षांनी अदलून बदलून वापरता येतील. त्यामुळे शरीराला सातत्यानी नवीन आव्हान देता येईल आणि शरीरात सुधारणा होत राहील.



आपल्या फिटनेस आराखड्यात वेट ट्रेनिंग चा समावेश आठवड्यातून २ ते ३ वेळेला जरूर करावा. त्यामुळे हाडे मजबूत होऊन त्यातील कॅल्शियम आणि इतर धातूंचे प्रमाण वाढण्यास मदत होते, ऑस्टियोपोरोसिस सारखे आजार टाळता येतात तसेच स्नायू घट्ट आणि बळकट राहतात. त्याशिवाय वजन कमी होऊन शरीराचा आकार कमी व्हायला मदत होते. बळकट आणि चिवट शरीर राखण्यासाठी नियमित वेट/रेसिस्टन्स ट्रेनिंग अत्यावश्यक आहे. 

तर सर्वानी व्यायाम करत रहा आणि माझा कानमंत्र लक्षात असू दया: 

थोडा जरी असला तरी नियमित व्यायाम अतिशय आवश्यक आहे!


AT A GLANCE


 





 

Thursday, April 27, 2023

 परिपूर्ण फिटनेस चे ५ पैलू .


    तुम्ही व्यायाम म्हणून फक्त चालणं, फक्त योगासन किंवा फक्त weight lifting करत आहात का? जेव्हा आपण असा एकाच प्रकारचा व्यायाम करत राहतो तेव्हा फिटनेसचे काही पैलू सुधारतात पण सर्वांगीण फिटनेस मिळत नाही. तेव्हा संपूर्ण फिटनेस मिळवण्यासाठी आपल्या व्यायामात आणखी कुठले घटक आले पाहिजेत ते पाहूया. सर्वांगीण फिटनेस चे ५ घटक आहेत जे आपल्या व्यायामात असले पाहिजेत. मात्र इथे एक गोष्ट मी स्पष्ट करते की या ब्लॉगमधे मी फक्त 'आरोग्यासाठी आवश्यक' अशा फिटनेस विषयी बोलणार आहे. 

    आता आरोग्यासाठी आवश्यक फिटनेस म्हणजे काय? शारीरिक फिटनेस चे वेगवेगळे प्रकार असतात का? व्यायाम करताना आपल्या सर्वांचीच आरोग्य आणि वजन दोन्ही सांभाळलं जावं अशीच अपेक्षा असते ना? हे अगदी खरं आहे की आपल्या सर्वाना व्यायाम करून बांधेसूद शरीर आणि उत्तम आरोग्य कमवायचं असतं. पण नक्की किती आणि कोणता व्यायाम करायचा हे मात्र आपल्या वैयक्तिक गरजांवर अवलंबून आहे. उदाहरणार्थ एखाद्या खेळाडूला आपला खेळ सुधारायचा असेल तर  तिला भरपूर अगदी कस लागणारा व्यायाम करावा लागेल. तिचा व्यायाम सामान्य माणसापेक्षा खूपच जास्त असेल. त्याचप्रमाणे खेळासाठी लागणाऱ्या फिटनेसच्या इतर  घटकांवरदेखील तिला भरपूर काम करावं लागेल जसे muscle power, चपळता, संतुलन इत्यादि. 

    पण आपण सर्वसामान्य माणसं आरोग्यासाठी, शरीर निरोगी ठेवण्यासाठी तसेच वजन आटोक्यात ठेवण्यासाठी व्यायाम करत असतो. आपले  रोजचे आयुष्य उत्साहानी, न दमता जगता यावे  हे आपले ध्येय असते. त्यामुळे आपला व्यायाम खेळाडूंपेक्षा वेगळा होतो. 

तर आता हे 'आरोग्यासाठी आवश्यक ' असे फिटनेसचे घटक पाहुयात. 


१] दमसांस (Cardiovascular Endurance)- 


दमसांस म्हणजे आपल्या हृदयाची, फुफ्फुसांची आणि रक्ताभिसरण संस्थेची, काम करणाऱ्या स्नायूंना पुरेसे रक्त पुरवण्याची क्षमता. म्हणजे स्नायू जास्त काम करायला लागले तर जास्त रक्त पुरवता यायला पाहिजे. यालाच आपण stamina म्हणतो. हा घटक सुधारण्यासाठी आपण चालणे, पळणे, नृत्य, पोहोणे असे व्यायाम करू शकतो. 




२] स्नायूंची ताकद (muscular strength) - 


स्नायूंची ताकद म्हणजे आपला एखादा स्नायू जास्तीतजास्त किती वजन उचलू शकतो याची क्षमता. म्हणजेच तो स्नायू जास्तीतजास्त किती जोर निर्माण करू शकतो ही क्षमता. स्नायूंची ताकद चांगली असेल तर आपली हाडे मजबूत राहतील, शरीराचा आकार सुधारेल तसेच आवश्यक त्या ठिकाणचा घेर कमी होईल. Fitness चा हा पैलू सुधारण्यासाठी आपण नियमित वजने उचलण्याचा तसेच योगासानांचा व्यायाम करू शकतो.  




३] स्नायूंची तग धरण्याची क्षमता (muscular endurance) - 


स्नायूंची तग धरण्याची क्षमता म्हणजे न थांबता आकुंचन प्रसरण करत राहण्याची क्षमता. हा पैलू तपासल्याने एखादा स्नायू न दमता किती वेळ व्यायाम करत राहू शकतो हे आपल्याला कळते. हा देखील एक प्रकारचा दमसासच आहे. स्नायूंची टिकाव धरून राहण्याची ताकद वाढली की शरीराचा थकवा कमी होतो. हा पैलू सुधारण्यासाठी आपण नियमित weight training तसेच योगासाने करू शकतो.




४] लवचिकता (flexibility)- 


चांगली लवचिकता असणे म्हणजे सांधे त्यांची संपूर्ण हालचाल करू शकणे. म्हणजेच सांध्यांना आपली पूर्ण range of motion वापरता येणे. यावरून, रोजच्या हालचाली करताना सांधे आणि स्नायू किती वळू शकतात, ताणले जाऊ शकतात ते कळून येते. शरीराला इजा टाळण्यासाठी, स्नायूत पेटके येणे टाळण्यासाठी चांगली लवचिकता असणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमित योगासने तसेच stretching करता येतील. 








५] शरीराची जडणघडण (Body Composition)- 


शरीराची चांगली जडणघडण असणे म्हणजे शरीरात चरबी आणि इतर घटकांचा समतोल असणे. आपल्याला शरीरात lean body mass म्हणजे स्नायू, हाडे, इतर अवयव जास्त प्रमाणात हवे आहेत आणि चरबी कमी प्रमाणात हवी आहे. ही जडणघडण सुधारल्यामुळे शरीर बांधेसूद होते तसेच
 हृदयरोगाची शक्यतासुद्धा कमी होते. वरील सर्व घटक आपल्या workout  मध्ये समाविष्ट करून तसेच योग्य आहार घेऊन आपण शरीराची चांगली जडणघडण राखू शकतो.  





आपल्या workout मधे विविध प्रकारचे व्यायाम  गुंफून आपण वरील सर्व पैलूंवर काम करू शकतो. जर आपला आपण व्यायाम करणार असू तर एखाद्या प्रशिक्षित Trainer चा सल्ला घ्यावा. व्यायामाचा एक आराखडा बनवून, शिकून घ्यावा. काही आठवड्यांनी  किंवा महिन्यांनी तो गरजेनुसार बदलून घ्यावा. व्यायामाचे सर्व घटक विचारात घेतल्याने आरोग्याला प्राधान्य दिले जाते आणि फक्त वजनाला महत्व दिले जात नाही. एक सुदृढ, उत्साही शरीर घडविण्यासाठी वरील पाचही पैलूंवर प्रत्येक आठवड्याला काम करावे लागेल. आपण कोणत्याही वयाचे असलात तरीही, कारण आपल्याला रोजच्या आयुष्यात हे घटक वापरावे लागतात!

Blog संपवण्यापूर्वी तुमच्यातील नियमित व्यायाम करणाऱ्या सर्वांचे मी अभिनंदन करते. कुठल्याही प्रकारचा पण नियमित व्यायाम करणाऱ्यांचे अभिनंदन! मात्र नियमित व्यायाम करणाऱ्या आणि न करणाऱ्या सर्वांनी हा ब्लॉग नीट वाचून काढा, आपल्या व्यायामात योग्य ते बदल करा आणि व्यायाम करत रहा. 

माझा कानमंत्र लक्षात असू दया: 

थोडा जरी असला तरी नियमित व्यायाम अतिशय आवश्यक आहे!




सारांश 










  

  










योगासनांचा सराव सुरू करताना आजच्या काळात योगासनांचे महत्व सगळ्यांना पटलेले आहे. योगासने प्रत्येकाने नियमीत करावीत असे माझेदेखील मत आहे. म्हण...