डाएट करू की व्यायाम?
वजन कमी करतानाआपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की डाएट जास्त महत्वाचे का व्यायाम? वेट लॉस करताना आपल्याला असा उपाय हवा असतो ज्यामुळे वजन हमखास कमी होईल आणि भविष्यात कमीच राहील. रोजच्या धावपळीत वजन कमी करताना कशाला किती महत्व द्यायचं हे ठरवणं गरजेचं असतं. म्हणून या लेखात याच प्रश्नाचं उत्तर शोधुयात: आहार जास्त महत्वाचा आहे का व्यायाम?
अर्थात या प्रश्नाचं उत्तर इतकं साधं सरळ नाही! प्रथम आपले शरीर कॅलरीज कशा खर्च करते ते पाहुयात. समजा आपण दिवसभरात १०० कॅलरीज खर्च करतो. आपल्याला आश्चर्य वाटेल की यातील सत्तर टक्क्यांहून जास्त कॅलरीज या केवळ शरीर जिवंत ठेवून शरीरातील सर्व प्रक्रिया चालवण्यासाठी वापरल्या जातात. या व्यतिरिक्त १० ते १५% कॅलरीज अन्न खाणे आणि पचवणे यासाठी वापरल्या जातात. उरलेल्या १५ ते २०% कॅलरीज इतर हालचालींसाठी खर्च केल्या जातात. या इतर हालचालींमध्ये रोजची अन्हिके म्हणजे आंघोळ वगैरे, घरातील वावर आणि व्यायाम या सर्वांचा समावेश होतो. आता या कॅलरीज कुठल्याही कामासाठी खर्च केल्या तरी त्या येतात आपल्या आहारातूनच. आहारातून मिळणाऱ्या कॅलरीज त्या दिवशी लगेच वापरल्या जातात किंवा चरबीच्या स्वरूपात साठवल्या जाऊन नंतर गरजेनुसार वापरल्या जातात.
आता आहार आणि व्यायामाचे वजन कमी होण्यातले योगदान समजून घेणे सोपे जाईल. आपण आत्ताच पहिले की आपल्या रोजच्या कॅलरी खर्चातील ७०% हिस्सा हा शरीरातील आवश्यक प्रक्रिया करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळेच आपला रोजचा आहारच समतोल आणि पोषक असण्याची गरज आहे. समतोल आणि पोषक आहार ही हवा आणि पाण्याइतकीच आपली मूलभूत गरज आहे. चांगला व्यायाम वाईट आहाराची कमतरता भरून काढू शकत नाही. समतोल आणि पोषक आहार चांगल्या तब्येतीचा पाया असल्यामुळे तो नियमीत घेणे ही आपली जीवनशैलीच असली पाहिजे. परंतु वजन कमी करताना जेव्हढया कॅलरी आपण खातो त्यापेक्षा जास्त खर्च कराव्या लागतात. त्यामुळे आहारातून पोषण आणि समाधान मिळण्याबरोबरच निकृष्ट आणि निरुपयोगी कॅलरीज कमी होणे आवश्यक आहे. प्रत्येकाचा समतोल आणि पोषक आहार त्याच्या/तिच्या राहणीमान आणि जीवनशैलीनुसार वेगवेगळा असू शकतो.
थोडक्यात सांगायचे तर वजन कमी करायला आहार आणि व्यायाम दोन्ही महत्वाचे आहे!
दोन्हींत फरक आहे तो frequency चा. त्याचा आपल्याला किती वेळा विचार करायला लागतो याचा. आपल्याला आहाराविषयी दिवसातून ४ ते ५ वेळेला विचार करावा लागतो आणि योग्य निर्णय घ्यावे लागतात. याउलट आठवड्यातून ३ ते ४ वेळेला व्यायामदेखील वजन कमी करायला मदत करू शकतो. आहार आणि व्यायामाचा समतोल साधल्याने आपला 'वेट लॉस' योग्य पद्धतीने होईल. म्हणजे आरोग्याला हानी न पोचता होईल. चांगल्या आहारामुळे शरीरातील चरबी कमी होईल, स्नायूंच्या वाढीला मदत होईल आणि शरीराच्या सर्व आवश्यक प्रक्रियांना कॅलरीज मिळतील. चांगल्या व्यायामानी शरीरातील स्नायूंचे प्रमाण वाढेल, चरबी कमी होईल, ताकद, दामसांस वाढेल तसेच शरीराचा आकार सुधारेल.
वेट लॉस च्या दोन्ही पैलूंसाठी सर्वात महत्वाचे काय तर नियमीतपणा!



No comments:
Post a Comment