Friday, December 15, 2023

योगासनांचा सराव सुरू करताना


आजच्या काळात योगासनांचे महत्व सगळ्यांना पटलेले आहे. योगासने प्रत्येकाने नियमीत करावीत असे माझेदेखील मत आहे. म्हणूनच या ब्लॉगमधे योगासनांच्या सरावाविषयी थोड्या टिप्स देण्याबरोबर काही गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. 

पहिल्यांदा योगासनांचा सराव सुरू करताना पाळावयाच्या टिप्स बघू:

१] योगासने पहिल्यांदाच करणार असल्यास ऑफलाइन फॉरमॅट म्हणजेच प्रत्यक्ष शिक्षकासमोरच करावीत. योगाभ्यासातील बारकावे समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे आणि ते प्रत्यक्ष योगवर्गात हजेरी लावूनच शक्य आहे. 

२] योगासनांचा सराव प्रत्येकानी करावाच हे खरे असले तरी आपल्या वैयक्तिक मर्यादा लक्षात ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकाची लवचिकता, व्यायामाची क्षमता वेगळी असते त्यामुळे प्रत्येक योगासन नीट जमेलच असे नाही. त्यामुळे सहन होईल तेवढेच करावे. 

३] सुरुवातीला कदाचित फक्त १० ते १५ सेकंदे योगासन स्थिर ठेवता येईल आणि फक्त १० ते १५ मिनिटेच क्लास करता येईल. नियमित सरावानी सहनशक्ति  वाढेल आणि जास्त अभ्यास जमू लागेल. 

४] योगासनांचा अभ्यास करताना आसनस्थिति इतकेच श्वास आणि शरीरावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. प्राचीन काळापासून सर्व योगगुरूंनी पुनः पुनः हे अधोरेखित केले आहे. 

५] योगासने करताना शरीराच्या सांध्यांची संपूर्ण हालचाल होते. त्यामुळे हातपाय मोकळेपणानी हलविता येतील असे कपडे घालावेत. 

६] योगासने करताना पोट तसे रिकामे असावे म्हणजे कुठलीही स्थिति घेताना त्रास होणार नाही. सकाळी लवकर अभ्यास करणार असल्यास अर्धा ते एक तास आधी एखादे छोटे केळे किंवा एक दोन खजूर खाता येतील म्हणजे पोट भरणार नाही परंतु गरजेपुरत्या कॅलरीज मिळतील. 

७] योगाभ्यास सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यामुळे कुठल्या हालचाली टाळावयाच्या आहेत ते कळेल. 


योगाभ्यासाविषयी काही गैरसमजांचे स्पष्टीकरण पाहू. 


१] योगासनांनी कधीही दुखापत होऊ शकत नाही - अतिरेकी, क्षमतेच्या पलीकडे केलेल्या कुठल्याही हालचालीचा शरीराला त्रास होतो आणि दुखापत होऊ शकते. याला योगासनेदेखील अपवाद नाहीत. त्यामुळे काळजीपूर्वक हळू हळू अभ्यास वाढवणे गरजेचे आहे. 

२] योगासने करणे म्हणजे अगदी सोपा व्यायाम करणे -  योगासन सराव हा संगीताच्या तालावर, जलद अथवा जोरकसपणे करण्याचा व्यायाम नाही. परंतु योगासन करणेसुद्धा आव्हानात्मक असते आणि यात शरीराबरोबरच मन आणि श्वास स्थिर ठेवण्याचे आव्हान असते. त्याचप्रमाणे शरीराला अनोळखी किंवा नवीन स्थितिदेखील प्रयत्नपूर्वक धरून ठेवावी लागते. 

३] माझे शरीर लवचिक नाही त्यामुळे मला योगासने  करता येणार नाहीत - अनेक योगासने करायला सोपी असतात. सुरुवातीला त्यांचा नियमीत सराव केल्यावर शरीराची लवचिकता वाढते आणि अवघड आसने जमू लागतात. 

४] माझी योगासन स्थिति एखाद्या पुस्तकात किंवा विडियोत दाखवल्याइतकी चांगली दिसत नाही. मग माझ्या सरावाचा काही उपयोग होतोय का? - आपली योगासन स्थिति ही आपल्या क्षमतेनुसार, सरावानुसार आणि वयानुसार असणार आहे. त्यामुळे प्रयत्न करत राहणे सर्वात महत्वाचे असते हे लक्षात ठेवावे. शरीराला त्याचा उपयोग नक्की होतो. 

तेव्हा योगासने योग्य व्यक्तीकडून शिकून घेऊन आपला एक अभ्यासक्रम बसवून घ्यावा आणि योगाभ्यास नियमीतपणे करावा. शरीराचा चिवटपणा वाढवण्यासाठी योगासने अतिशय महत्वाची आहेत. Repetitive stress injuries (म्हणजे एकच हालचाल पुनःपुन्हा केल्याने होणाऱ्या दुखापती उदाहरणार्थ computer वर खूप वेळ काम केल्याने होणाऱ्या दुखापती), त्याचप्रमाणे खेळाडूंची  होणारी शारीरिक झीज टाळण्यासाठी योगासने उपयुक्त आहेत. वयानुसार होणारी शरीराची झीज कमी करण्यासाठी योगाभ्यास जरूरी आहे. मानसिक स्थैर्य, शांतता मिळविण्यासाठीदेखील योगाभ्यास अत्यंत उपयोगी आहे. 


तुम्हा सर्वांना व्यायाम करत राहण्यासाठी शुभेच्छा. माझा कानमंत्र लक्षात असू दया: 

थोडा असला तरी नियमित व्यायाम अतिशय आवश्यक आहे!





No comments:

Post a Comment

योगासनांचा सराव सुरू करताना आजच्या काळात योगासनांचे महत्व सगळ्यांना पटलेले आहे. योगासने प्रत्येकाने नियमीत करावीत असे माझेदेखील मत आहे. म्हण...